............................................
...थकलास तू किती !
............................................
आलो तुझ्यासमोर ! दचकलास तू किती !
मी तूच ! व्यर्थ दूर सरकलास तू किती !
आहे तुझ्याच आसपास...जे तुला हवे....
शोधात दूर दूर भटकलास तू किती !
नव्हतेच जे कधीच...सापडेल ते कसे ?
साराच भूतकाळ उचकलास तू किती !
आहे तुझ्या मनात चांदणे खरेच का ?
ही सावली तुझीच...टरकलास तू किती !
नाही तुझी तुलाच थोरवी कळायची...
गर्दीस त्या सुमार खटकलास तू किती !
मी सांगताच - `राग हा न, आग आग ही... `
हे ऐकलेस मात्र भडकलास तू किती !
मन मोकळे करून टाकलेस तू म्हणे....
जग मात्र हे म्हणेल- `बहकलास तू किती !`
बोलावणार कोण यापुढे तुला तिथे ?
त्या काजव्यांसमोर चमकलास तू किती !
तुज वाटले असेल - चिकटणार मी तुला...
तो प्रश्न लागलीच झटकलास तू किती !
गुंत्यास घाबरून राहिलास एकटा...
या मोकळेपणात अडकलास तू किती !
चालून वाट संपवून टाक तू तुझी...
थांबून राहिलास व थकलास तू किती !!
- प्रदीप कुलकर्णी
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा