वागणे माझे खरे होते;
हे जगासाठी बरे होते.
भाळलो मी फक्त पाण्यावर;
भोवताली भोवरे होते.
सांगणे मी सोडले देवा;
देव सारे घाबरे होते.
जाळली ज्यांनी उभी वस्ती;
शांत त्यांचे चेहरे होते.
पाळली नाही कधी साधे;
श्वान घरचे चावरे होते.
वारही केले असे त्यांनी;
हात दोन्ही पांढरे होते.
कोरडे जमले न काहीही;
अंतरी माझ्या झरे होते.
-अभिषेक घ. उदावंत
संवेदना रायटर्स कम्बाईन, अकोला.
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा