........................................
...मी खरा की तू खरा ?
........................................
भास मज माझा विचारी - मी खरा की तू खरा ?
ही पुरे झाली हुशारी - मी खरा की तू खरा ?
मध्यरात्री काल मी जे दुःख स्वप्नी सोसले...
आज ते म्हणते दुपारी - मी खरा की तू खरा ?
उत्तराची भीक नाही घालता आली मला...
प्रश्न आला तोच दारी - मी खरा की तू खरा ?
शेवटी झोळीच ती ! माझ्याहुनी मोठी जरा...
मी भिकारी; तू भिकारी - मी खरा की तू खरा ?
दोन सत्ता, दोन हत्ती...याचसाठी झुंजती
याचसाठी साठमारी - मी खरा की तू खरा ?
तोतया होऊन माझा राहशी माझ्या घरी....
व्हायची खानेसुमारी - मी खरा की तू खरा !
वगळ तू सोईप्रमाणे जे तुला वगळायचे...
गोष्ट ही सांगेल सारी - मी खरा की तू खरा !
कोण जाणे आरशाला एवढा का लागला -
- प्रश्न हा माझा जिव्हारी - मी खरा की तू खरा ?
- प्रदीप कुलकर्णी
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा