प्रमोद खराडे यांची गझल...

जनार्दन केशव म्हात्रे - ⏱ १ मिनिट

वेदना जरी उरात या.. दिगंत
वाटतो परी जगास, भाग्यवंत

मी कुठे अशांत, एकटा, हताश
एक या उरात बोच, एक खंत

मिरवशील तू मला कुठे कशास
मी नसे तसा झकास शोभिवंत

ते जिथे, तिथे सुखात दैवजात
दुःख हे मला कसे असे अनंत

या मनात टळटळीत.. भरदुपार
या मनात.. एक तोतया वसंत

तू चुकून बहरलीस... डवरलीस
दरवळे किती अशात.. आसमंत

तू मला दिला दगा जुना फिरून
ही जखम नवी तरी मला पसंत


- प्रमोद खराडे

गझल