जन्म हा

अजय अनंत जोशी - ⏱ १ मिनिट

वाटला मला तरी सुखात जन्म हा
घेतलाय मानुषी जगात जन्म हा


रीत माहिती कुठे मला जगायची ..
तीच येथ शोधण्या दिलात जन्म हा


जात-पात-पंथ-भेद या इथे किती!
त्यावरी करेल शांत मात जन्म हा


धाय मोकली तरी कुणी न यायचे
वाहिला कुठेतरी पुरात जन्म हा


बाप कोणता न माहिती असे मला
माय सोडते कुण्या पथात जन्म हा


अमृतास घेवुनी कधी न पाहिले,
हाय! का करून सोडलात जन्म हा ?


पाहुनी चहूंकडे बघे दिसायचे
पेटला इथे कुण्या उरांत जन्म हा


जिद्द आणि ध्येय कार्य साधण्या हवे
पाहिजे न चांगल्या घरात जन्म हा


अंश जाहलो तुझा करेन सार्थ मी
भेटला पुढे जरी वनात जन्म हा


सूख पाहिजे सदा पुढे जगास या
घेतला म्हणून वेदनांत जन्म हा

गझल