एक कविता

अजय अनंत जोशी - ⏱ १ मिनिट

येशील काय माझी होऊन एक कविता ..
देईल स्वप्न सारी बांधून एक कविता


तोडीत वॄक्ष होता कोणी तिथे कलंदर ..
पण त्या मुळांस होती पकडून एक कविता


मी घातली जराशी समजूत चांदण्यांची;
तेंव्हा क्षणांत गेली चमकून एक कविता


जेंव्हा कुण्या कवीला ठेवील जग उपाशी,
खाईल तेथ अपुली तोडून एक कविता


चंद्रास झाकले अन् सूर्यास झाकले पण ..
या चांदण्यास होती बिलगून एक कविता


गगनांत वीज असते, डोळ्यांत का नसावी?
लिहिलीच आसवांनी पेटून एक कविता


काळास बंध नाही, प्रतिभेस काळ नाही
होते जुन्या-नव्याला घुसळून एक कविता


काळे कुणीच नाही, गोरे कुणीच नाही
दे रंग जीवनाला ओतून एक कविता


....अपूर्ण

गझल