जशी जिंदगी ढळू लागली
*तशी तशी ती कळू लागली
कुपोषणाची कीड पसरता
नवी पालवी गळू लागली
शांति-ज्योत ही पेटविल्यावर
शांतता होरपळू लागली
दुनियेची बस तुडुंब भरली
जिंदगी लोंबकळू लागली
कशास फुंकर तिने घातली?
जखम पुन्हा भळभळू लागली
जरी आंधळा तरी जगाची
नेत्रपल्लवी कळू लागली
गंध तिचा वाऱ्यावर फिरला
कळी कळी दरवळू लागली
अशी जन्मभर तेवलीस की
ज्योत उराशी जळू लागली
पाय रोवुनी उभी रोपटी
वादळेच उन्मळू लागली
*ह्या संकेतस्थळावरील एका सद्स्याच्या सुचनेनुसार मतल्यात बदल केला आहे.
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा