टाळणे कंटाळणे सोपे न माना
शायराला पाळणे सोपे न माना
सारखा जातो कुठे मी कोण जाणे
सारखे धुंडाळणे सोपे न माना
वेदनांची दीर्घशी कादंबरी ही
या मनाला चाळणे सोपे न माना
जेवढी येते मजा टोचून आम्हा
तेवढे किंचाळणे सोपे न माना
प्रेम नावाचा गुन्हा केलाय मीही
लोचनांचे वाळणे सोपे न माना
की खडे फेकाल धान्यातून जेव्हा
नाव माझे गाळणे सोपे न माना
हे तुम्हा जमणार नाही, शब्द माझा
बिनक्रिया वाचाळणे सोपे न माना
भेट मृत्यूचीच देते शेवटी ते
जीवनाचे भाळणे सोपे न माना
ते सरावातून येते, यत्न सोडा
आमचे ओशाळणे सोपे न माना
आसवांची ईंधने ओता जराशी
प्रेत माझे जाळणे सोपे न माना
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा