वादग्रस्त

केदार पाटणकर - ⏱ १ मिनिट

माझ्यात दंग आहे, माझ्यात मस्त आहे
भलताच का तरीही मी वादग्रस्त आहे ?

नाही मदार माझी अदृश्य ईश्वरावर
मी नेहमी स्वतःवर ठेवून भिस्त आहे

म्हटलेच जीवनाला अपघात एक जर का
-- तर मी अनेक वर्षे अपघातग्रस्त आहे

बहुतेक सर्व होते नियमास मोडणारे
मी एकटा कदाचित् पाळीत शिस्त आहे

इतक्यात वास्तवा तू, देऊ नकोस हाका
...कवटाळण्यात स्वप्ने मी खूप व्यस्त आहे 

गझल