गझल तालात चालावी

भूषण कटककर - ⏱ १ मिनिट

जरी बेताल मी माझी गझल तालात चालावी
सदा रंगीन वाटावी तिन्ही कालात चालावी


असावे मी नसावे मी तयाचे फारसे नाही
तिची जादू जगी या शेकडो सालात चालावी


तिला ना वावडे दु:खे, सुखे, भीती नि मोहाचे
मनाचा जो असावा हाल त्या हालात चालावी


असो खोडी तिला लाडीकशी की गुदगुली व्हावी
प्रियेची जीभ लाजेने जशी गालात चालावी


जगाच्या कारभाराची करावी चौकशी त्याने
दिला जाईल जो देवास, अहवालात चालावी

गझल