मनास केले असे मोकळे

सोनाली जोशी - ⏱ १ मिनिट

मनास केले असे मोकळे,  क्षितीज उरले नाही

जरी एवढा प्रवास केला, गाव शोधले नाही
मनास केले असे मोकळे,  क्षितीज उरले नाही

टपटपणाऱ्या आठवणींना  बघून तेव्हा दारी 
भिजले मन  हे जराजरासे.. पण हळहळले नाही 

'उंबरठा  झाला पर्वत की रस्त्याने थांबवले?
भेटण्यास ना येण्याचे मज कारण कळले नाही

देठ मनाचा नाजुक पण तो  अजून ताठच आहे
(कोण म्हणाले मी सुमनांना, तोलून धरले नाही)

पहा कोपरा अस्तित्त्वाचा  झाडून  टाकला मी 
पण  माझे घर  त्याने  अजून का चकाकले नाही?.

मनात एका  घोळत  होता विचार काहीबाही....
पण दुसरे मन  पक्के  इतके, बिलकुल  चळले नाही
                                            
-सोनाली जोशी

गझल