ती मजा ना राहिली

भूषण कटककर - ⏱ १ मिनिट

आज मी जगण्यामधे ती मजा ना राहिली
रोजचे मरण्यामधे ती मजा ना राहिली


कोवळे सुकुमारसे, दु:ख देता का कुणी?
अश्रु आवरण्यामधे, ती मजा ना राहिली


या मला जिंकून जा, खेळ खेळू वेगळा
खुद्द मी  हरण्यामधे, ती मजा ना राहिली


काळज्या म्हणती म्हणे, राठ झाला कोडगा
यास भादरण्यामधे, ती मजा ना राहिली


त्या तुझ्या हसण्यामधे, लाजुनी बघण्यामधे
केस सावरण्यामधे, ती मजा ना राहिली


मी पवित्रा घेउनी, आडवळणाला सुखे
एकटी धरण्यामधे, ती मजा ना राहिली


आज गुरगुरण्यामधे, ती मजा ना राहिली
नाटके करण्यामधे, ती मजा ना राहिली


बुडवुनी पेल्यामधे, बोचरे इतिहास ते
शुद्ध ओसरण्यामधे, ती मजा ना राहिली


जीवनाची ना नशा, आणि मृत्यू लांबतो
मी असे उरण्यामधे, ती मजा ना राहिली


 


 



 

गझल