लाघवीशी वाटते आहे

भूषण कटककर - ⏱ १ मिनिट

सुरांची रागदारी लाघवीशी वाटते आहे
छटा ही जीवनाची भैरवीशी वाटते आहे


तिची ही गाठ केसांची सुटावी एकदापुरती
मनाला आज विश्रांती हवीशी वाटते आहे


कसे इच्छेस हाताळू ,हिला दाबू, तिला सोडू
निघे जी जी मनातुन ती नवीशी वाटते आहे    ( सुचले - हजारो ख्वाहिशे वरून- गालिब )


'सुचावे ना चुकीनेही तिला मी यापुढे आता'
तिची ही मागणीही वाजवीशी वाटते आहे


जगाला नोकरी माझ्या चुकांची नोंद घेण्याची
चुका करण्यात आता थोरवीशी वाटते आहे


जरा लाजायचो स्वीकारताना आग्रही दु:खे
नशा त्यांच्यात आता माधवीशी वाटते आहे


जरी वस्त्रांत गुंडाळी तने, खोटी मने भेटी
प्रजा येथील सारी नागवीशी वाटते आहे


नभा माजू नको लोकांपरी, थोडी क्षितीजे बघ
तुझीही मान तेथे ओणवीशी वाटते आहे



 


 





 

गझल