रूक्मिणी...

निरज कुलकर्णी - ⏱ १ मिनिट

रूक्मिणी...

तो मनाला सांजवेळी, भावना देऊन गेला...
आठवांचे स्पंद सारे, जागते ठेवून गेला...

मी कसे सांगू सख्याला, काय या ओठात आहे?
माझिया डोळ्यांतुनी तो, तारका वेचून गेला...

गाजली मैफील त्याची, आज सार्‍या आसमंती;
तो निशेला भारलेली, भैरवी गाऊन गेला...

संयमाचे गंजलेले, बंध मी पाळू कशाला?
आजला श्वासात माझ्या, श्वास तो माळून गेला...

जाहले राधा कधी मी, जाहले मीरा तयाची;
तो हरी मज बावळासा, रूक्मिणी बनवून गेला...

- निरज कुलकर्णी.

वृत्त - व्योमगंगा

गण - गालगागा गालगागा गालगागा गालगागा

मात्रा - २८
गझल