............................................
...केव्हातरी !
............................................
उगवणारा वाढतो अन् वाढणारा संपतो केव्हातरी !
खेळ हा चालू युगांपासून...का खोळंबतो केव्हा तरी ?
रोज मी कित्येकदा मन मारतो, संतापतो, कातावतो...
- आणि एकांतात माझ्याशीच मग मी तंडतो केव्हातरी !
फेड सारी बंधने; फेकून दे... अन् ये नभाखाली अता...
मेघ एखादा असा माथ्यावरी ओठंगतो केव्हातरी !
याच बाबीचे मला आश्चर्य वाटे का अताशा सारखे ?
रंग काळाही कसा अन् पांढराही... रंगतो केव्हातरी !
दाटते काहूर अन् साठून ते हृदयात माझ्या राहते...
सांजवेळी, कोरड्या रात्रीस मी ओथंबतो केव्हातरी !
ओरडावेसे कितीदा वाटते...ऐकून घेईना कुणी ...
मी मुका होऊन दुःखाने तुझ्या आक्रंदतो केव्हातरी !
ओळखू आला तुला हेतू...कधी शंका मनी डोकावते...
अन् तुझ्याशी बोलतां आवाज माझा कंपतो केव्हातरी !
तू कितीही घाल संबंधांस शर्तींची-अटींची कुंपणे...
शेवटी साधासुधा माणूस मी...उल्लंघतो केव्हातरी !
देव दगडाचा नि धातूचा असो की रक्त-मांसाचा असो...
पाय मातीचेच त्याचेही अखेरी...भंगतो केव्हातरी !!
- प्रदीप कुलकर्णी
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा