.........................................
लाज !
.........................................
बांधले गेले जरी अंदाज काही !
योग्य नाही बोलणे मी आज काही !
खोल हो आधी सुमद्रासारखा तू....
कोरड्या वाळूस नसते गाज काही !
आव कोणीही किती आणोत आता...
आणता येणार नाही बाज काही !
बाब आधी मुद्दलाची संपवू या...
दे, नको देऊ, मला तू व्याज काही !
तृप्त पोटाचा मला सल्ला असा की -
लष्कराच्या भाकऱ्या तू भाज काही !
जो नको तो अर्थसुद्धा सांगती हे...!
शब्द कावेबाज, धोकेबाज काही !!
भंगली स्वप्ने; उमेदी संपल्या का ?
व्हायचे नाही असे नाराज काही !
राहिलो मी शांत, झाला फायदा हा....
बंद झाले येथले आवाज काही !
भीड माझीही अताशा चेपलेली...
राहिली नाही तुलाही लाज काही !
- प्रदीप कुलकर्णी
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा