हृदय असते उगाचच!

भूषण कटककर - ⏱ १ मिनिट

चला हृदयास आणू फिरवुनी रस्ते उगाचच
निरुद्योगी करे धंदे घरी नसते उगाचच


जणू माहीत नाही प्रेम आहे काय याला
हसे हज्जारदा झाले तरी फसते उगाचच


इथे संपूर्ण साली जिंदगी धोक्यात येते
तिला ना माहिती ती पाहुनी हसते उगाचच


कुठे केली प्रशंसा मी तिच्या कातिल रुपाची?
मला पाहूनही नुसतेच रसरसते उगाचच


कशाला ठेवशी देवास मी थकलो विचारुन
अरे बाबा नको रे हे हृदय असते उगाचच


किती सांभाळतो बेणे तरी सुधरेच ना ते
जरा आनंद झाला की असे डसते उगाचच ( मिरवायला रदीफ? )


तिलाही वाटते की स्पर्श व्हावे चोरटे पण
अशी बसते जवळ ती की जणू बसते उगाचच


अरे भरतोय ना वेड्या तुला विश्वास नाही?
इथे पेलाच लाजे हृदय फसफसते उगाचच ( मि. र. ? )


तशी ती थंड वाटे पाहताना, भेटताना
न जाणे का तिचे हे अंग कसकसते उगाचच?


कुणी घेऊन जा हृदयास माझ्या फालतू या
हवा आराम तेव्हा फार वसवसते उगाचच 


 


 



 


 


 


 


 


 

गझल