मी खेळलो जिथे तो वाडा पडून गेला
कोर्या इमारतींना थोडा नडून गेला
आता खुली न दारे, नाही कळे कुणाचे
एकांत माणसाला का आवडून गेला?
डोकावया न होती दारात लाज, आता
बोलावले जयाला तो आखडून गेला
राखी दिवाळि दसरा, श्रावण अता न हसरा
प्रत्येक सण अताशा आला, रडून गेला
आजी म्हणे मुलांनो, तुम्हास ना कळावे
जो काळ या ठिकाणी तेव्हा घडून गेला
हा कोपर्यात आहे वासा किती जुनासा
वाड्यात शोभणारा, आता सडून गेला
ती भांडणे जणू की पाण्यात बुडबुडे ते
हल्लीच आग जो तो खरि पाखडून गेला
कोणी चुकून पुसता झालेय काय हे हो?
मी गहिवरून बोले, वाडा पडून गेला
मुलगा कुठे कुणाचा कोणास ठाव होते?
दिलदार तो शिरस्ता आता झडून गेला
गेले कुणी कि सारे एकत्र व्हावयाचे
हल्लीच जो बिचारा, मेला, अडून गेला
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा