...............................................
कधीतरी चांदण्यात दोघे....
...............................................
कधीतरी चांदण्यात दोघे फिरायला जाऊ !
पुन्हा जुना काळ आपला तो स्मरायला जाऊ !
निघू चला साचलेपणाच्या पलीकडे आता...
चला कपारीत डोंगराच्या झरायला जाऊ !
खरेच रेखाटलेस हे चित्र तू कुणासाठी ?
उगीच का रंग त्यात माझे भरायला जाऊ ?
तुझ्या हिशेबी तरी तसा मी कधी कुठे होतो ?
उगीच का हातचा तुझा मी धरायला जाऊ ?
नको मना, एकटेपणाचा तुरुंग एकाकी....
फिरून गर्दीत भोवतीच्या शिरायला जाऊ... !
तिथे शहाणे बरेच होते करायला चर्चा...
उगीच वेडा तिथे कशाला ठरायला जाऊ ?
सवंगडी एकही न माझा हयात गावी त्या ...
कुणास भेटू ? तिथे कशाला मरायला जाऊ ?
इथेच आहे बरा उभा मी...उभाच राहू द्या...
पुढे कशाला फिरून मागे सरायला जाऊ ?
पुन्हा झुगारून सर्व रीती, रिवाज दुनियेचे....
पुन्हा नको ते, नको नको ते, करायला जाऊ...!!
- प्रदीप कुलकर्णी
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा