चांदण्याची तोरणे(पुस्तक परिचय)

केदार पाटणकर - ⏱ २ मिनिटे

वा.न.सरदेसाई हे मराठी गझलेतील खूप जुने जाणते नाव.
ध्वनिफीत रसिकांना ते हे का कुणी फुलांना सांगायला हवे या गझलेद्वारे माहीत झाले. भीमराव पांचाळे यांनी ती गझल गायलेली आहे.
सहा वर्षांपूर्वी सरदेसाई यांचा चांदण्याची तोरणे हा सुबक गझलसंग्रह प्रकाशित झालेला असून संग्रहात रुबायाही आहेत. एकोणसत्तर वृत्तातील एकशेवीस गझला व सर्व मान्यताप्राप्त वृत्तांतील चोपन्न रुबाया असलेला मराठी गझल संग्रह असे मुखपृष्ठावरच प्रसिध्द करण्यात आलेले आहे. हा सरदेसाईंचा दुसरा गझलसंग्रह होय.
डॉ.राम पंडितांची प्रस्तावना सरदेसाईंच्या या संग्रहाबाबत सविस्तर सांगते. 'गेयता हा सरदेसाईंच्खुया गझलांचा प्राण आहे', असे श्री.पंडित म्हणतात. सरदेसाई यांचे 'मनःपूर्वक' हे मनोगतही वाचनीय आहे. मनोगतात एका ठिकाणी त्यांच्या म्हणण्याचा आशय असाः काही वेळा मला ओळी सहज स्फुरल्या आहेत. नंतर कळले की तशी वृत्तेच नव्हती. मग, मला स्फुरले ते नव्या लयींचा पर्यायाने वृत्तांचा जन्म होता.
प्रामाणिक भावना, जगाचे अचूक निरीक्षण आणि वृत्तांवरची जबरदस्त पकड या बाबींचा प्रत्यय संग्रहात ठायी येतो. शिवाय, गझलकाराला कोणताही शब्द वर्ज्य नाही. टीच(दारावर पडणारी थाप), अरेच्या, फाटक्यातुटक्या, वगैरे असे शब्द गझलकाराने गझलांमध्ये व्यवस्थित बसवलेले आहेत.परिचयाच्या रदीफापेक्षा खरे म्हणजे, कुणाला काही हे वेगळे रदीफ आढळतात. गझलकाराला कोणताही शब्द वर्ज्य नाही, असे संग्रहातून दिसते. काही ठिकाणी, विरामचिन्हांच्या मदतीने शेर समजवण्याचा प्रयत्न आहे.

दर्जेदार शेरांचे काही मासले असे..
हे लोक न, हे रोगच आहेत, खरे म्हणजे
राहूच नका ह्यांच्या समवेत, खरे म्हणजे

समाजसेवेपुढे कुणालाच वेळ नव्हता
गरीब अपुले स्वतःच अश्रू पुशीत होते

पहाटेस ये भेटण्या एकटी
तिथे चोंबडा शुक्रतारा नको

रसिक मनाला मेजवानी देणारा आणि अभ्यासू मनाला विचारात पाडणारा, असा काहीसा हा संग्रह आहे.मुंबई येथील ठाकुरद्वारच्या 'इंद्रनील प्रकाशन' ची ही निर्मिती आहे. अक्षरजुळणी धुळे येथील का.स.वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्थेची आहे. मुखृपृष्ठावरील चित्र जॉन फर्नांडिस य़ांचे आहे. मलपृष्ठावरील परिचयात सरदेसाईंच्या व्यक्तिमत्वाचे इतर पैलूही आहेत.

...गझल जगणा-यां सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!