नेहमीचे हे तराणे तू असा टाळून गेला
पापण्यांना आसवांची तोरणे माळून गेला !!
नेहमीचा तोच तोरा तीच पुन्हा बेफिकीरी
का असा हा जीव वेडा त्यावरी भाळून गेला !!
काळजाचा ठाव घेणे पाहुनीही ना पहाणे
पोळलेल्या जाणिवांना का पुन्हा जाळून गेला !!
हुंदक्याचा भार झाला एक एका आठवांना
श्रावणाच्या धुंद राती मोगरा वाळून गेला !!
शाप आहे हा मला उ:शाप मागू मी कुणाला
फाटक्या झोळीस माझ्या तो जणू चाळून गेला ..!!
ममता....
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा