राहिला नाही फुलांना वास थोडा;
अन् कमी झाला फुलांचा त्रास थोडा.
एवढ्याने माणसे झाली सुगंधी;
अत्तराचा छान होता वास थोडा.
सोडला जेव्हा तुझा मी नाद तेव्हा;
फक्त काही दिवस झाला त्रास थोडा.
ज्या फुलांच्या काल मी बागेत गेलो;
त्या फुलांचा रोज होतो भास थोडा.
भाकरीचा जीव तेव्हा शांत झाला;
घातला पोटात जेव्हा घास थोडा.
सज्जनांनी जर मला बदनाम केले;
तर कमी होईल त्याचा त्रास थोडा.
एवढा मी गुंतलो नाही तुझ्याशी;
की, तुझा लागेल आता ध्यास थोडा.
जीव हा गेला किती बघ शांततेने;
बोलला मज गोड जेव्हा फास थोडा.
हा गजांचा वा फुलांचा कैदखाना;
बंधनांनी गुदमरे हा श्वास थोडा.
-- अभिषेक घ. उदावंत
संवेदना रायटर्स कंम्बाईन,
अकोला.
Taxonomy upgrade extras