चल मना बघुयात कोणी आपले मिळतेय का
आतुनी नसुदेत वरवर कोणी तळमळतेय का
मागणी नशिबाची करता देव डाफरला मला
पीठ आला खायला कुणी आंधळे दळतेय का
चौक आला नेहमीचा घर तिचे डावीकडे
पाहुया पाऊल हे उजवीकडे वळतेय का
आज ती नाहून गेली नदिकिनारी एकटी
प्रश्न गावाला पडे की ही नदी जळतेय का
पापण्या आतून बघतो शांतता मज लाभते
लोचने खुलताच चिंता 'धार ओघळतेय का'
साफ मन घेऊन मी आरंभिले जन्मास या
ना कळे कोणामुळे अन एवढे मळतेय का
ताण देऊन खेचतो, एकेक अक्षर शोधतो
आवरा कवितेस कोणी सारखी पळतेय का
शब्द ना बाहेर यावे जे मला असती हवे
त्यामुळे ती ओढणीचा फास आवळतेय का
अर्धमेल्या ऊंदराला काक पाहूनी म्हणे
सोडतोका प्राण बघुया दैव फळफळतेय का
बेवफाई लपविण्या ती सारखी पुसते मला
हे तुला पटतेय का अन हे तुला कळतेय का
Taxonomy upgrade extras
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा