सांगितले मी कुणातरी की शब्दाला आकार हवा
कुण्या कवीने म्हटले मजला 'कुणाकुणाला मार हवा?'
'मीही आहे तयार' म्हटले, 'पण थोडेसे थांबा ना..'
विष काढण्याआधी जरासा नागाचा फुत्कार हवा
तिने पहावे, तिने म्हणावे किती काम सांगशी तिला?
तीच अता कंटाळुन म्हणते, 'बसण्यासाठी पार हवा'
चोरुन घेती शब्द कुणाचे अन खाऊनी जाती भाव
सलाम यांना करण्यासाठी निश्चित वेडा ठार हवा
दुर्मुखला चेहरा घेऊनी प्रेमाचे गुणगान करी
टाळ्या पडण्या यांना लाखों रसिक तसाच टुकार हवा
टेकडीवरी कुठल्या झाले प्रसन्न यांना देव म्हणे
अरे खुळ्यांनो, प्रसन्न होण्या पर्वतही मंदार हवा
ध्यान लावुनी गुरू पहुडले हवेत काही फुटांवरी
टेकू लावुन चेले म्हणती गुरूसही आधार हवा
(इतरत्र प्रकाशित)
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा