रोजचेच.. (तरही गझल)

ज्ञानेश. - ⏱ १ मिनिट

(कौतुक शिरोडकरांच्या 'रोजचेच..' या गझलेवरून सुचलेले हे काही  शेर. एवढ्या लहान वृत्तात लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आहे. त्यामुळे चूभूद्याघ्या.)


==========
गिरवतोय  रोजचेच
नाद  तेच, वाद  तेच..


रोज 'आजचे  भविष्य'
हाय! कालसारखेच..


भेटलो  किती  दिसात,
हासलो  किती  बळेच..


का  विचारशी  उगीच,
ही  दशा  तुझ्यामुळेच !


सत्य  बोलतो  खुशाल
संपलेत  डावपेच.


काळजी  करू  नकोस;
'सोडली'  तुझ्यासवेच..


गे, तुला  कधी  कळेल-
जिंकतात  कासवेच..!!


वाद  वाढवू  उद्यास
तूर्त  आज  एवढेच !


 


 


-ज्ञानेश.
==========