
मी पाहिले उजळूनही अन पाहिले निखळूनही
पण जाणले नाहीस तू लांबूनही , जवळूनही
मग शेवटी कळले मला होतो किती पाण्यात मी
पाणीच होतो शेवटी दर्यापरी उसळूनही
ह्या आसवांना एकदा शिक्षाच केली पाहिजे
उरतात का ओल्या स्मृती सा-या व्यथा निथळूनही
आयुष्यभर जगलो तुझ्या त्या मस्त बेतासारखा
होतो तुझ्या लक्षात मी कित्येकदा उधळूनही
तो वेगळा होता गुन्हा , ती वेगळी होती सजा
ती कैद नाही संपली त्या साखळ्या वितळूनही
तूर्तास हे गोंजारणे बाजूस राहू दे मना
मागेपुढे केव्हातरी जाईन मी हुरळूनही
आता तुम्हाला कोणते कारण जगाया द्यायचे?
नाही समाधानी तुम्ही माझे जिणे चघळूनही
-- वैभव जोशी
Taxonomy upgrade extras
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा