माणुसकीही मरण्याच्या बेतात जणूं


माणुसकीही मरण्याच्या बेतात जणूं
जीवन इथले सरण्याच्या बेतात जणूं...

वाहत जातो घटिकांचा हा ओघ असा..,
घागर वाटे भरण्याच्या बेतात जणूं.....

धावत असतो जो तो मिथ्याच्या मागे,
..सत्य भयानक धरण्याच्या बेतात जणूं...

आजवरी मी लढलेला जोशात किती..!
आज कसा पण हरण्याच्या बेतात जणूं...

ती जाताना सोबत नेते सर्व ॠतू..
...श्रावण उरतो झरण्याच्या बेतात जणूं...

मी कोणाला कळतो आहे, - वा नाही...!
..हेही नाही ठरण्याच्या बेतात जणूं....

हा भवसागर मोहांचे जंजाळ खरे,
जो तो बुडतो..तरण्याच्या बेतात जणूं...

का मनमोहक हसते आहे रात्र अशी...?
घाव मनावर करण्याच्या बेतात जणूं...

-- संतोष कुलकर्णी