अंदाज : डॉ. श्रीकृष्ण राऊत

डॉ. श्रीकृष्ण राऊत - ⏱ १ मिनिट

चिखलात खोल फसले सगळेच पाय आता;
मातीस सापडेना काही उपाय आता.

सौंदर्य आपले ती सांभाळते असे की,
नाहीच लेकराला पाजीत माय आता!

टपलेत भोवताली चारीकडून बोके;
सांगा कुण्या खुबीने वाचेल साय आता?

वात्सल्य कोणते हे आहे मला कळेना;
ही वासरास खाते दररोज गाय आता.

आक्रोश उंच जाता आकाश कंप पावे;
अंदाज येत नाही होईल काय आता.

********************************************
http://mazigazalmarathi.blogspot.com
********************************************