रसायन !

प्रदीप कुलकर्णी - ⏱ १ मिनिट

रसायन !

उघडून ठेव दारे तूही तुझ्या मनाची...!
मीही पुरी तयारी केली पलायनाची !

बहरे कुणाकुणाचे...कोमेजते कुणाचे...
इतकीच ही कहाणी प्रत्येक यौवनाची !

स्वप्ने कणाकणाची आली फुलून हिरवी -
मातीस लागता या चाहूलही घनाची !

इतके अनोळखी का झाले परस्परांना ? 
हृदयास या पटेना का खूण स्पंदनाची ?

मी ऐकले असे की, घनदाट खूप आहे -
मज वाट सापडेना माझ्यातल्या वनाची !!

नाही; नसो, मनाची नसते बऱ्याच वेळा - 
आहे कुणास कोठे थोडी तरी जनाची !

तू बंधनांविनाही आहेस बांधलेला...
आता कशास भीती कुठल्याच बंधनाची !

वस्तीत माणसे या आहेत सभ्य काही - 
झाडे चुकून काही आहेत चंदनाची !

अस्वस्थता मनाची थांबूनही न थांबे...
मेंदूत वाढ झाली कुठल्या रसायनाची ?

प्रदीप कुलकर्णी

 

 

 

गझल