आपलेही स्वप्न होते - हे खरे ना?
वाटले सारे खरेही - हे खरे ना?
मी म्हणालो - जायचे आहे जरासे
चालली होतीस तूही - हे खरे ना?
तापल्या वाळूत माझी वाफ झाली
पण बरसलो मी तिथेही - हे खरे ना?
लुप्त झाली वाहणारी शब्दधारा
जाणिवांचा बर्फ झाला - हे खरे ना?
कोण रडतो तो रिकाम्या गोलघुमटीं?
दु:ख त्याचे अंतरी आहे खरे ना?
आंधळ्या तुजला 'विसू'रे मोरपंखीं -
फक्त दिसतो रंग काळा - हे खरे ना?
Taxonomy upgrade extras
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा