विसावा

प्रदीप कुलकर्णी - ⏱ १ मिनिट


विसावा

येत आहे मला चूक समजून माझी !
मी पुन्हा वाट पाहीन बदलून माझी !

वेळ झाली; निघावेच लागेल आता
वाट पाही कुणी दूर ठरवून माझी!

तू पुढे हात आधीच केलास का हा...?
एकदा भेट घे नीट, जवळून माझी !

या जगाच्या रिवाजात नाही कुठे मी
रीत पटली कुणाला न पटवून माझी !

काय मागून मागू तुला मागणे मी?
पालखी ने अखेरीस उचलून माझी!

या जिवाला विसावा न लाभे कुठेही...
मी घरे पाहिली रोज बदलून माझी !

- प्रदीप कुलकर्णी

गझल