लागली आहे समाधी स्तब्ध पानन् पान माझे



लागली आहे समाधी स्तब्ध पानन् पान माझे
लागले आहे दिसू माझ्यात आता रान माझे

मिळकतीच्या वंचनेतुन जीव माझा मुक्त झाला
फायद्याचे वाटते आहे मला नुकसान माझे

ठीक झाले मी उलट उत्तर दिले नाही कुणाला
जाउनी नडतील दुनियेला अता अपमान माझे

देव माझ्याहून मजला वाटतो जर भिन्न, म्हणजे
लाभले नाही मला अद्यापही वरदान माझे

तू नदी आहेस पण येशील तर ये पूर होउन
मी कधीचे ठेविले आहे खुले मैदान माझे

कोण जाणे काय शोधे टाळुनी संसार अपुला
हिंडते वाऱ्याबरोबर एक हिरवे पान माझे

ती समजली की तिला देईन मी शोधून वाटा
मी समजलो की तिला ठाऊक आहे रान माझे

एकदा मी देव झालो आणि या कैदेत पडलो
हे हजारो जीव आता रोज खाती कान माझे

-- चंद्रशेखर सानेकर