म्हणून माझी झेप कधी उंच जाऊ शकली नव्हती


म्हणून माझी झेप कधी उंच जाऊ शकली नव्हती
कारण माझ्या पायतळीची जमीन खचली नव्हती

कसे म्हणू की मी माझ्या मर्जीचा मालक होतो
तुझ्या कैदखान्याची मज हद्दच कळली नव्हती

मनात जे काही घडले ते कळले, दिसले नाही
गडगडाट झाला, मेंदूची वीज चमकली नव्हती

आता पाहू इतकी सुंदर दाद कोण देतो ते
अशी कल्पना याआधी कोणाला सुचली नव्हती

असे बरसले नव्हते आधी मेघ कधी याआधी
आग तुझी याआधी केव्ही अशी भडकली नव्हती

गाठ तुझ्याशी पडल्यावर जन्माची गफलत कळली
`गाठ सुटावी, अशी कुणाशी गाठच पडली नव्हती`

घरात तस्कर रहात होते, आज सिद्ध झाले, पण
कैक पिढ्यांना आधीच्या ही गोष्टच कळली नव्हती

युगाएवढी जखम कपाळावर माझ्या दिसणारच
घाव नभाचा होता, ती मुंगीची टपली नव्हती

-- चंद्रशेखर सानेकर