
ही दुनिया घालत आहे कसले हे नवीन कपडे
ती जे जे झाकत होती ते टाकी आता उघडे
जे रणांगणावर होते त्यांनी समझोते केले
जे छावणीत बसलेले ते करू लागले झगडे
अफवेने त्यांच्या नुसत्या हे जंगल जर घाबरते
असणार पाहिले त्यांनी एवढे भयंकर जबडे
त्यांनीच घेतला आहे एकेक दिशेचा ताबा
जे करती भाषा मोघम, बोलतात शब्द निसरडे
अश्रूंची झाली माती, मातीतुन उठले टाहो
टाहोंचे झाले झेंडे, झेंड्यांना फुटले सरडे
या दुनियेइतके दुसरे कोणीच गबाळे नाही
या दुनियेइतके नाही कोणाचे सुंदर रुपडे
देवाच्या दारापाशी माणूस उभा आहे पण
काळीज फाटके त्याचे, मेंदूचे भांडे उपडे
ही माझी कविता कुठल्या शाळेतुन शिकली नाही
बारीक समजते सगळे पण बोले जाडेभरडे
-- चंद्रशेखर सानेकर
Taxonomy upgrade extras
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा