शांत मी राहू कशी



शांत मी राहू कशी रे भेटला आहेस तू
आज शब्दांच्या पुराने वेढला आहेस तू !

आज जन्माशीच माझ्या बोलले इतकेच मी
जीव घेणाऱ्या स्मृतींचा गलबला आहेस तू !

हासती, समजावती सांभाळती माझे जिणे
काय या हळव्या ऋतूंशी बोलला आहेस तू !

भावनांची, जाणिवांची एक गुंतागुंत मी
काय या गुंत्यामध्येही गुंतला आहेस तू !

फक्त माझ्या कल्पनेचे चित्र तू आहेस का ?
की मला रेखाटणारा कुंचला आहेस तू !

-- नीता भिसे